Home | बिझनेस | संजिवनी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना सहाय्य निधी 7 ऑगस्ट पर्यंत दिला जाईल : मंत्री गावडे

संजिवनी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांना सहाय्य निधी 7 ऑगस्ट पर्यंत दिला जाईल : मंत्री गावडे

Sanjivani Sugar Factory and Gawade

धारबंदोड्यातील संजिवनी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा 6 कोटी रूपयांचा सहाय्य निधी 7 ऑगस्ट पर्यंत दिला जाईल. या संदर्भात मुख्यमंत्री व वित्त सचिवांकडे झालेल्या बैठकीत चर्चा झाली असून 7 ऑगस्ट आधी ऊस उत्पादकांना हा निधी वितरीत केला जाईल, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी दिली. 

संजिवनी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांनी धरलेल्या साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गावडे बोलत होते. 

ऊसाच्या शेतकामासाठी ऊस उत्पादकांना प्रत्येक टनावर सहाशे रुपये देण्याचे आश्वासन मंत्री गावडे यांनी दिले. त्यांना चतुर्थी आधी सदर पैसे दिले जातील, असेही त्यांनी सांगितले. त्यांनंतर ऊस उत्पादकांनी साखळी उपोषण मागे घेतले. ऊस उत्पादकांचा सुमारे 6 कोटी निधी प्रलंबित आहे.  

मंत्री गावडे म्हणाले, की रेशन दुकानांवर कडधान्य  दुय्यम दर्जाचे मिळत असल्यास ते नेऊ नये.  कडधान्यांचा भरपूर कोटा एकत्र साठविला जातो, त्यामुळे या समस्या उद्भवतात. स्वस्त धान्याच्या दुकानांवर मिळणारे कडधान्य दुय्यम दर्जाचे मिळत असल्यास त्यासंदर्भात नागरी पुरवठा खात्याच्या तालुका स्तरीय अधिकार्‍यांना माहिती द्यावी, किंवा त्यासंदर्भात तक्रार नोंद करावी. तक्रारीची दखल घेऊन  याची चौकशी करण्यास सांगितले जाईल, असे मंत्री गावडे यांनी सांगितले. 

राज्यातील स्वस्त धान्याच्या दुकानांवर नेटवर्क समस्येमुळे बायोमेट्रीक अनेकदा चालत नाही. त्यामुळे बायोमेट्रीकची पध्दत रद्द करण्याची मागणी केंद्रीय नागरी पुरवठा मंत्रालयाला करण्यात आलेली आहे. सध्या ही पध्दत अवलंबणे  सक्तीचे आहे, असेही मंत्री गावडे यांनी स्पष्ट केले.