Home | एंटरटेनमेंट | राज्यात चित्रपट चित्रिकरणाला परवानगी : ‘इएसजी’कडून परिपत्रक जारी

राज्यात चित्रपट चित्रिकरणाला परवानगी : ‘इएसजी’कडून परिपत्रक जारी

Film Shooting in Goa

राज्य सरकारने राज्यात चित्रपट तसेच अन्य चित्रिकरणास परवानगी दिली आहे. राज्य सरकारची नियमावली आणि करोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे पाळून चित्रिकरण करता येईल, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतेजा यांनी  परिपत्रकाव्दारे दिली आहे. 

राज्यात चित्रिकरणासाठी परवानगी घेताना राज्य सरकारची नियमावली तसेच कोरोनाबाबतची तत्त्वे पाळण्याची हमी निर्मात्यांना द्यावी लागेल. तसेच चित्रिकरणासाठी निवडण्यात आलेल्या ठिकाणांची माहितीही द्यावी लागेल. परवानगी देण्यासाठीच्या प्रक्रियेत काही बदल झाल्यास संबंधितांना कळविण्यात येईल. त्यानूसार संबंधितांना प्रक्रिया पाळावी लागेल.

सरकारी नियमावलीचे उल्लंघन केल्यास  तत्काळ चित्रिकरणाची परवानगी रद्द करण्यात येईल. तसेच उल्लंघनामुळे परवाना रद्द झाल्यास निर्मात्यांनी परवान्यासाठी दिलेली रक्कम त्यांना परत न मिळाल्यास त्यास मनोरंजन संस्था जबाबदार राहणार नाही, असेही सतेजा यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

गोमंतकीय निर्माते तथा दिग्दर्शक राजेंद्र तालक  यांनी यासंदर्भात म्हटले, की चित्रिकरणास मंजुरी देण्याचा सरकारने घेतलेला निर्णय योग्य असला तरी राज्यात  मोठ्या चित्रपटांचे चित्रिकरण व करोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे अशक्य आहे. लोकांत जागृती झाल्यामुळे त्यांच्याकडूनही चित्रिकरणास विरोध होऊ शकतो.

दरम्यान, कोरोनामुळे देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा राज्यातील सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे राज्यातील चित्रिकरणही बंद आहे. आता करोना सोबत अर्थव्यवस्थेला गती देण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत. त्यामुळे चित्रिकरणासही मंजुरी देण्यात आली आहे.