Home | आरोग्य | जर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या भूक लागत असेल तर याच्यामागील कारणे जाणून घ्या

जर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या भूक लागत असेल तर याच्यामागील कारणे जाणून घ्या

Feeling Hungry Early in the Morning

आपली प्रत्येकाची जीवनशैली ही वेगवेगळ्या प्रकारे चालू असते. जसं घड्याळ असतं तसंच आपलं शरीर हे घड्याळासारखच असतं. आपल्या प्रत्येक गोष्टी करण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. सकाळचा नाष्टा, दुपारचं जेवण, रात्रिचं जेवण वगैरे. पण काहींना अवेळी खाणं लागतं. रात्री झोपण्यापूर्वी जरी जेवलेलं असलं तरीदेखिल मधेच मध्यरात्री वगैरे भूक लागते. पण हे योग्य आहे का? निरोगी शरीराच्या दृष्टीने विचार केल्यास हे अवेळी खाणं किंवा अरबट चरबट खाणं योग्य नाही. मग यासाठीची कारणे काय आहेत त्याचबरोबर उपाय काय आहेत ते आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. 

सकाळी उठल्यावर प्रत्येकाला भूक लागतेच कारण ७ ते ८ तासांच्या झोपेत जरी शरीराची हालचाल होत नसली तरीही आपल्या शरीरातील कॅलरी बर्न होतच असतात. पण जर रात्री मधेच प्रचंड भूक लागून जाग येत असेल तर त्याचा अर्थ काहीतरी चुकते आहे. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात, जसे की..

झोपण्यापूर्वी जास्त खाणे,झोप कमी होणे, प्री मेन्स्त्रुअल सिंड्रोम,औषधे,तहान, स्ट्रेस, रात्रीच्या वेळी व्यायाम, गरोदरपणा, अशी कारणे असू शकतात. आता त्यासाठी काय उपाय आहे व त्याचे दूरगामी परिणाम देखील आपण पहाणार आहोत.

झोपेतून मधेच उठावं लागू नये म्हणून झोपण्यापूर्वी पोटभर खाणं देखील अत्यंत चूकीचं ठरतं. कारण त्याचमुळे नंतर पुन्हा भूक लागण्याची शक्यता असते. फास्ट फूड खायला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आता सगळ्यांनाच आवडतं. पण त्याचा रात्रीच्या जेवणात फास्ट फूड खाल्ल्याने व जास्त कॅलरी असणारे पदार्थ खाल्ले तर लवकर भूक लागते. पोटात कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्च हे जास्त प्रमाणात जातात. यामुळे रक्तातील साखर एकदम वाढते.

रक्तातील साखर पेशींमध्ये शोषली जावी यासाठी इन्सुलिन हे हार्मोन स्त्रवले जाते. इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेची पातळी पटकन खाली उतरते ज्यामुळे भुकेची जाणीव होते. यावरती काहीतरी उपाय असेलच ना.. तर तो कोणता ते पाहुया. रात्रीचे जेवण शक्यतो हलके घ्यावे, जास्त कॅलरी त्यात नसाव्यात. यामुळे रक्तातील साखर वाढून इन्सुलिन खूप प्रमाणात स्त्रवले जाणार नाही. असे केल्यास आपल्याला जास्ती भूक लागणार नाही व त्यामुळे रात्रीच्या जेवणातचे अनिश्चित वेळापत्रक नीट होईल.

रात्रीची सलग झोप होत नसेल तर मध्ये जेव्हा जेव्हा जाग येते तेव्हा भूक लागल्यासारखे वाटते, तसेच सकाळी उठल्यावर सुद्धा भूक लागण्याचे प्रमाण वाढलेले असते. यामागे ग्रेनेलीन नावाच्या हार्मोनचा हात आहे. जेव्हा झोप अपूर्ण राहते तेव्हा या हार्मोनचे प्रमाण वाढते. ग्रेनेलीन या हार्मोनचा संबंध भूक लागण्याशी आहे. याचे प्रमाण वाढले की जास्त प्रमाणात भूक लागते. यावरचा उपाय सोपा आहे, भुकेने कंटाळून जर सकाळी जाग येऊ नये असे असेल तर रात्रीची झोप व्यवस्थित घ्यावी. शक्यतो सात ते आठ तासांची सलग झोप ही गरजेची असते.

बायकांना पाळी सुरु होण्याआधी साधारण चार पाच दिवस त्रास होतो. शरीरात हार्मोन्समधील बदलणाऱ्या पातळीमुळे हे होते. या दिवसात झोप कमी होणे, दमल्यासारखे वाटणे, जास्त भूक लागणे, विशिष्ट पदार्थ खावासा वाटणे यासारखे त्रास होऊ शकतात. हा प्री मेंस्ट्रुअल सिन्ड्रीम त्रास तात्पुरताच असतो. पाळी संपल्यावर, पुढची पाळी सुरु व्हायच्या काही दिवस आधीपर्यंत ही लक्षणे दिसत नाहीत.

काही औषधांनी भूक वाढते. डिप्रेशनसाठीची औषधे, स्टीरॉईड, मायग्रेनसाठीची औषधे, डायबेटीसची औषधे (इन्सुलिन) अशी काही औषधे तुम्हाला सुरु असतील तर तुम्हाला सकाळी उठल्यावर जास्त भुकेची जाणीव होण्याची शक्यता आहे.तुमच्या तब्येतीच्या हितासाठी ही औषधे घेणे गरजेचे असते त्यामुळे भूक शमवण्यासाठी सकाळी उठल्यावर काहीतरी खाणे याशिवाय पर्याय नाही.

शरीराला दिवसभर पाणी कमी प्रमाणात मिळाले तर डीहायड्रेशन होऊ शकते. डीहायड्रेशन म्हणजे शरीरला होणारी पाण्याची कमतरता.यामुळे थकवा येऊ शकतो.रात्री अपरात्री या थकव्यामुळे तहान लागून जाग येण्याची शक्यता असते. पण जाग आल्यावर नक्की तहान आहे का भूक आहे असा गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशावेळी, रात्री अचानक भूक लागून जाग आली तर आधी एक ग्लास पाणी पिऊन बघावे. पाणी प्यायल्यावर भुकेची जाणीव गेली तर समजावे की हे डीहायड्रेशन, थकव्यामुळे झाले. असे होऊ नये, रात्री तहान लागून जाग येऊ नये यासाठी दिवसभर योग्य प्रमाणात पाणी प्यावे. तहानेमुळे काय काय होऊ शकतं याचं उदाहरण.

स्ट्रेस हा सगळ्यात मोठा शत्रू आहे.काही माणसे अशी असतात की जी छोट्या छोट्या गोष्टींचे स्ट्रेस घेतात.पण एक गोष्ट लक्षात येत नाही की या स्ट्रेस मुळे स्वतःचेच जास्ती नुकसान होते. स्ट्रेस मुळे शारिरिक त्रास तर होतातच शिवाय मानसिक त्रासही होतात. जेव्हा एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस, टेन्शन येते तेव्हा तुमची भूक वाढते. अशावेळी रात्री सुद्धा भूक लागून जाग येते. स्ट्रेसमुळे शरीरातील काँरटीसोल नावाचे हार्मोन वाढते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले जाते आणि त्याचमुळे भूक लागण्याचे प्रमाण सुद्धा वाढते. स्ट्रेस कमी व्हावा यासाठी योगासने, ध्यान, प्राणायाम यासारख्या व्यायामांचा उपयोग होतो.

व्यायामामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. याचसाठी व्यायामाचे महत्व अधोरेखित केले जाते. पण जर रात्रीच्या वेळी खूप प्रमाणात व्यायाम केला तर रक्तातील साखरेची पातळी खूपच कमी होते ज्यामुळे रात्री अपरात्री भूक लागून जाग येण्याची शक्यता असते. यासाठी शक्यतो रात्रीच्या वेळी खूप व्यायाम करणे टाळावे.काही  वेळा अगदीच पर्याय नसतो, दिवसभर इतर व्यापांमुळे वेळ होत नाही. अशावेळेला रात्री जर व्यायाम करावा लागत असेल तरत्यानंतर पोटभरीचे खाल्ले पाहिजे. व्यायामानंतर आणि  झोपण्यापूर्वी जास्त प्रोटीन्स असलेले पदार्थ खावेत. डीहायड्रेशन आणि थकवा येऊ नये म्हणून भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.

गरोदर बायकांना सहसा रात्रीच्या वेळी भूक अनावर होऊन जाग येते. सहसा यात काही काळजी करण्यासारखे नसते, रात्रीच्या वेळी जास्त प्रोटीन असणारे पदार्थ खाल्ल्याने आणि झोपण्यापूर्वी कोमट दुध घेतल्याने रात्रभर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि हा त्रास कमी होतो. जर गरोदरपणात रात्रीच्या वेळी भूक लागण्याचे प्रमाण खूप जास्त असेल तर ते गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाचे लक्षण असू शकते. बाळाच्या जन्मानंतर हा मधुमेह बरा होतो आणि रात्रीच्या वेळी भूक लागण्याचा त्रास हळूहळू कमी होतो.

याशिवाय जर तुमचे वजन खूप जास्त असेल, थायरॉईडचा त्रास असेल तर तुम्हाला रात्रीच्या वेळी भूक लागून जाग येण्याची शक्यता असते. त्यामुळे जर वरील कारणे तुमच्या बाबतीत लागू नसतील तर यासाठी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. रात्री व्यवस्थित झोप लागावी, पोट भरलेले राहावे, मध्ये भुकेमुळे जाग येऊ नये यासाठी चौकस आहार घ्यावा. वर सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या जेवणात काहीतरी हलके खावे, भरपूर पाणी प्यावे, व्यायाम करावा.रात्रीच्या वेळी भूक लागून जाग येण्याचे मुख्य कारण रक्तातील साखरेची पातळी कमी होणे हे आहे. तुमचे वजन जास्त असेल तर हा त्रास जास्त होतो त्यामुळे वजन कमी करणे हा एक महत्वाचा उपाय आहे.