Home | आरोग्य | जर तुमच्यापैकी कोणालाही टॉन्सिसल्सचा त्रास होत असेल तर जाणून घ्या यामागची कारणे आणि करा हे उपाय..

जर तुमच्यापैकी कोणालाही टॉन्सिसल्सचा त्रास होत असेल तर जाणून घ्या यामागची कारणे आणि करा हे उपाय..

Having Trouble with Tonsillitis

टॉन्सिसल्स च्या त्रासाबाबत आपण जर डॉक्टरकड़े गेलो तर आपल्याला ते काही औषधं देतात व गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. हा त्रास खुप जणांना होतो पण विशेष करून हा त्रास लहान मुलांमधे अधिक प्रमाणात दिसून येतो. थंडीच्या दिवसात टॉन्सिल्स चे त्रास बघायला मिळतात. घसा दुखणे व ताप येणे ही त्याची मुख्य लक्षणे आहेत. टॉन्सिसल्स चा त्रास होणे म्हणजे दूसरे तीसरे काहीही नसून टॉन्सिसल्स या अवयवाला सूज येते.

टॉन्सिल्स हे अवयव कोणते कार्य बजावतात आणि त्यांना सूज कशी येते, ती कमी कशी करायची, त्यासाठी काय काळजी घ्यायची आणि काय घरगुती उपाय हे आता आपण बघुया.

टॉन्सिसल्स या आपल्या घशाच्या मागच्या बाजूला असलेल्या ग्रंथी आहेत. या ग्रंथींचे काम म्हणजे शरीरात जेव्हा जीवाणू किंवा विषाणू घशावाटे शिरकाव करायला बघतात तेव्हा त्यांना तिथेच अडकवून मारून टाकायचे काम या ग्रंथी करत असतात. म्हणजेच टॉन्सिल्स हे आपल्या रोग प्रतिकारशक्ती वाढवतात व जणु काही ढालच असतात असे म्हणायला हरकत नाही.

आपल्या शरीरात व्हायरस किंवा बॅक्टेरीया शिरल्या शिरल्या त्यावर ऍटॅक करण्याचे काम टॉन्सिल्स करतात. पण याचमुळे कदाचित, अनेक जीवाणू आणि विषाणूंच्या संपर्कात आल्याने तिथे सतत इन्फेक्शन होऊन सूज येत असते. यालाच वैद्यकीय भाषेत ‘टॉन्सिलायटीस’ असे म्हणतात. ‘टॉन्सिलाइटिस’ होण्यामागे मुख्य कारण हे विषाणू (व्हायरस) असतात. पण काही वेळेला काही जीवाणूंमुळे (बॅक्टेरीया) सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकते.

टॉन्सिलायटीसची लक्षणे काय असतात?

१. घशात सूज येऊन, लाल दिसणे. (सूज ही टाॅन्सिल्स ग्रंथींना येते.)

२. टाॅन्सिल्स वर इन्फेक्शनचे पॅचेस दिसणे.

३. घशात, गिळताना आणि बोलताना सुद्धा प्रचंड प्रमाणात दुखणे.

४. थंडी भरून ताप येणे.

५. घसा बसणे.

६. डोकेदुखी, मानदुखी.

७. कानदुखी

लहान मुले एकमेकांबरोबर खेळताना अनेक जीवाणूंच्या, विषाणूंच्या संपर्कात येतात त्यामुळे ते सारखे आजारी पडण्याची शक्यता असते. मुलांना सारखे असे इन्फेक्शन्स होऊन त्यांना टॉन्सिलायटीस होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून लहान मुलांच्या मधे टॉन्सिल्स चे त्रास होण्याची शक्यता जास्ती प्रमाणात पहायला मिळते. प्रत्येकवेळी खेळून आल्यावर हात पाय धुत नाहीत व त्यामुळे किटाणु विषाणू तसेच राहतात व त्यामुळे मुलांमधे हा त्रास जास्ती आढळतो.

बॅक्टेरीयल टॉन्सिलायटीस झाला तर त्यावर उपाय म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेल्या ऍन्टीबायोटिक गोळ्या घेणे आणि आराम करणे. पण व्हायरल टॉन्सिलायटीसवर मात्र 

ऍन्टीबायोटिक गोळ्यांचा काही परिणाम होत नाही. त्यावेळी डॉक्टर ताप,सर्दी व दुखणे कमी होण्याच्या गोळ्या देतात. यावर उपाय म्हणजे आराम व घरगुती उपचार होय.

तर या त्रासातून मुक्त होण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत ते पाहुया.

१. दिवसभर भरपूर प्रमाणात गरम पाणी, चहा, कॉफी, सूप घेत राहावे. यामुळे घशात होणारी विषाणूंची वाढ थांबेल.

२. आराम करावा ज्यामुळे शरीर स्वतःच इन्फेक्शनशी लढा द्यायला तयार होईल.

३. व्हिटामिन ‘सी’ जास्त प्रमाणात असणारी फळे घ्यावीत ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढेल.

४. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्याने घशाला आराम मिळतो आणि आवाज बसला असेल तर तो सुटायला मदत होते.

५. गरम पाण्याची वाफ घेतल्याने सर्दी मोकळी होते आणि सर्दीमुळे होणारी डोकेदुखी सुद्धा कमी होते.

६. जेष्ठमध हे घशाच्या विकारांसाठी, खोकल्यावर अत्यंत प्रभावी औषध आहे. चवीला गोड असल्याने मुलांना सुद्धा ते द्यायला त्रास होत नाही. जेष्ठमधाचा तुकडा मुलांना तोंडात चघळल्याने घसा दुखणे कमी होते.

७. सुंठ, हळद, तुळशीची पाने आणि मिरी घालून केलेल्या चहामध्ये, एक चमचा मध घालून प्यायल्यास घशाला आराम मिळतो.

७ ते १० दिवसांचा कालावधी टॉन्सिल्स बरा व्हायला लागतात. ‘व्हायरल टॉन्सिलायटीस’ बरा व्हायला जास्त दिवस लागतात कारण त्यावर काहीच औषध नाही पण ‘बॅक्टेरीयल टॉन्सिलायटीस’ मात्र औषधे घ्यायला लागल्यापासून साधारण ३ ते ४ दिवसात बरा होतो.

कोणतीही ट्रीटमेंट चालू असली तरी पुष्कळ पाणी पिणे आणि भरपूर आराम करणे या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. काही वेळेला मात्र जर मुलांना सारखाच टॉन्सिलायटीस होत असेल तर मात्र ऑपरेशन करून ते काढावे लागतात. जर टॉन्सिल्स सारखे इन्फेक्शन्स होऊन पूर्णपणे खराब झाले असतील तर सहसा हा निर्णय घेतला जातो

मुलांचा ताप, खोकला बरा झाला नाही, त्यांना घसा दुखत असल्यामुळे खायला, प्यायला फारच त्रास होत असेल, अजिबातच आराम वाटत नसेल तर मात्र लगेच डॉक्टरांकडे त्यांना घेऊन जाणेच हिताचे आहे. मुलांना हा त्रास वारंवार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची? टॉन्सिलायटीस हा संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे त्याचा प्रसार थांबवण्यासाठी योग्य ती काळजी घ्यायला हवी.

१. सतत हात धुतले पाहिजेत. शाळेतून आल्यावर, खेळून आल्यावर, जेवणाच्या आधी किंवा काही खाण्याच्या आधी मुलांना हात धुवायची सवय लावली पाहिजे.

२. मुलांना शाळेत चमचे, डबा, बाटल्या या एकमेकांच्या वापरायच्या नाहीत हे शिकवले पाहिजे. कारण असे केल्याने एका मुलाला झालेले इन्फेक्शन सगळ्यांना व्हायला वेळ लागणार नाही.

३. मुलांना जर टॉन्सिलायटीस होऊन बरा झाला असेल तर त्यांचे जुने दात घासायचे ब्रश टाकून नवीन वापरायला द्यावेत. जुन्या ब्रशवर जीवाणू/विषाणू अडकून राहण्याची शक्यता असते.

४. मुले आजारी पडली तर त्यांना पूर्ण बरे वाटेपर्यंत घरीच आराम करू द्यावा.

५. आजारी मुलांना शाळेत पाठवून, क्लासला किंवा खेळायला पाठवून रोगाचा प्रसार करू नये. त्यांना सुद्धा या जबाबदारीची जाणीव करून द्यावी आणि त्यांना पूर्ण बरे वाटल्यावरच बाहेर, इतर मित्रांकडे पाठवावे.

६. मुलांना खोकताना, शिंकताना तोंडासमोर रुमाल धरायची सवय लावावी

प्रतिकारशक्ती वाढावी व त्याचबरोबर टॉन्सिसल्स चा त्रास लवकर बरा व्हावा यासाठी भरपूर आराम, व्हिटामिन ‘सी’ आणि सतत पाणी पिणे या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. टॉन्सिसल्स मुळे इतर कुठलेही आजार सहसा होत नसतात त्यामुळे अति घाबरून जाण्याची गरज नसते. पण जर खूपच त्रास होत असेल तर मात्र डॉक्टर आपरेशन चा सल्ला देतात.

Scroll to Top