वागातोर येथे आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीचा कर्ताधर्ता कपिल झवेरी याला शनिवारी मादक पदार्थांच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेनंतर सोशल मीडियावर त्याचे संबंध गोव्यातील राजनीतिक व्यक्तींशी जोडण्यात आले. त्यात गोव्याच्या मुख्यमंत्र्याचाही सामवेश आहे. आता हा झवेरी याने आपली यातून सुटका करून घेण्यासाठी पणजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसर, गोवा पोलिसने झवेरीच्या जामीन अर्जाला विरोध दर्शविला. आरोपी हा ख्यातनाम व्यक्ती आहे आणि संगीत पार्ट्यांचे आयोजन करत आहे, असे पोलिसांनी आपल्या उत्तरात नमूद केले.
त्या व्यतिरिक्त, ड्रग्जचा स्त्रोत शोधून काढणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी सांगितले. झावेरीसह अन्य चार आरोपींनीही संबंधित न्यायालयासमोर जामीन अर्ज दाखल केला असून आज गुरुवारी हे प्रकरण सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.
स्वातंत्र दिनाच्या रात्री सदर रेव्ह पार्टी आयोजीत करण्यात आली होती आणि गोवा पोलिसच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १५ ऑगस्टच्या मध्यरात्री हणजुणा येथील एका खासगी व्हिला येथे रॅव्ह पार्टीचा भंडाफोड केला होता. झवेरी व तीन महिला परदेशी नागरिकांसह – एलेना इमेलीनोवा २६, अना नुकामेंडी २८, आणि एवा ओवा २९ यांना नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टेंन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पोलिसांनी शैलेश शेट्टी नावाच्या व्यक्तीला रेव्ह पार्टीच्या संदर्भात गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी अटक केली. गोव्यातील लोकप्रिय ईडीएम फेस्टिव्हलच्या प्रवर्तकांपैकी एक असलेल्या शेट्टी यांने झवेरी यांच्यासमवेत रॅव्ह पार्टी एकत्रितपणे आयोजित केल्याचे म्हटले आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, शेट्टी यांना गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रोपिक सबस्टन्स अॅक्टच्या कलम २९ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याला पोलिस कोठडीत १ दिवसाचा रिमांड देण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पीआय मंगेश वळवईकर करत आहेत.