Home | न्युज | गोवा | मनपा कडून मार्केट जवळील 2 दुकानांवर धाड, 1 लाख रुपयांची गुटखा व सिगारेट पाकिटे जप्त

मनपा कडून मार्केट जवळील 2 दुकानांवर धाड, 1 लाख रुपयांची गुटखा व सिगारेट पाकिटे जप्त

CCP Raids Shops in Panaji

पणजी महानगरपालिकेने पणजी मार्केट जवळील 2 दुकानांवर धाड टाकून  कारवाई केली. या कारवाईत 1 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.  त्यात 50 हजार रूपयांचा गुटखा तर 50 हजार रुपयांची सिगारेटची पाकिटांचा समावेश आहे. या मालाची सोमवारी छाननी करण्यात आली, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली.

मनपाच्या बाजार निरीक्षकांनी पोलिसांच्या मदतीने पणजी मार्केट परिसरातील महादेव जनरल स्टोअर्स आणि महालक्ष्मी जनरल स्टोअर्स या दोन दुकानांवर कारवाई केली. त्यात सुमारे एक लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. महादेव जनरल स्टोअर्स या दुकानाकडे परवाना नसल्याचे आढळून आले आहे. सोमवारी या मालाची छाननी करण्यात आली असून त्यात जवळपास 50 हजार रुपयांचा गुटखा आढळून आला आहे.

गुटखा विक्रीवर कायद्याने बंदी असून मनपाकडून वेळोवेळी या संदर्भात तपासणी केली जाते. धाडसी कारवाई केल्याबद्दल पोलिस व मनपा कर्मचार्‍यांचे अभिनंदन करतो. या दोन दुकानांबद्दल लोकांच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे या दुकानांवर कारवाई केली, असे मडकईकर यांनी सांगितले. 

गुटखा आरोग्यासाठी हानिकारक आहे. मनपा दोषींवर कडक कारवाई करणार आहे. शहरात गुटखा विक्री करणार्‍या दुकानदारांवर कडक कारवाई केली जाईल. अनेकदा इशारा देऊन देखील तंबाखूजन्य पदार्थ विकले जात असल्याचे आढळून येत असल्याने यापुढे देखील कारवाईची मोहिम सुरुच राहिल. गरज पडल्यास दुकान सील केले जाईल, असा इशारा महापौर मडकईकर यांनी दिला.

Scroll to Top