Home | न्युज | गोवा | अखेर, राज्यातील ग्रामीण लोकसंख्येकडे 2021 पर्यंत पिण्याचे पाणी पोचणार

अखेर, राज्यातील ग्रामीण लोकसंख्येकडे 2021 पर्यंत पिण्याचे पाणी पोचणार

Tap Water in Goan Villages

गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्ती मिळून तब्बल ६० वर्षे होऊन गेली. मात्र, कित्येक गावात आजही पिण्याचे पाणी ही मूलभूत गोष्ट उपलब्ध नाही. अशा ग्रामीण भागातील रहिवाश्याना आता दिलासा मिळाला आहे. 

प्राप्त माहितीनुसार, केंद्रीय जल शक्ती मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी गोव्यातील लोकांना आश्वस्त केले कि २०२१ पर्यंत प्रयेक गावामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात येईल.  

गोव्याच्या संपूर्ण ग्रामीण लोकसंख्येला २०२१ पर्यंत पाण्याचे कनेक्शन मिळेल.  केंद्राचे ‘हर घर जल’ अभियान साध्य करणारे गोवा हे पहिलेच राज्य असेल, असेही  मंत्री शेखावत यांनी सांगितले.

यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री  दीपक पाऊसकर यांनी गोव्यातील लोकांना आश्वासन दिले होते, की 2024 च्या अखेरीस भाजप सरकार 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणार. 

शेखावत म्हणाले, की “जल जीवन मिशन चे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी राज्य सरकाराला सर्वतोपरी मदत करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे.”

आपल्या पत्रात शेखावत म्हणाले की, २०२०-२१ मध्ये गोव्यासाठी देण्यात आलेल्या निधीचे ३ कोटी रुपयांवरून १२ कोटी रुपये करण्यात आले आहे.

पिण्याचे पाणी व स्वच्छता सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गोव्याने २०२०-२१ चा वार्षिक कृती आराखडा सादर केला. ज्यात मुख्य सचिव परिमल राय यांनी केंद्राला २०२१ पर्यंत १००% नळ जोडणी देण्याचे आश्वासन दिले.

२०१९ मध्ये पंतप्रधानांनी सुरू केलेल्या जल जीवन मिशनचे उद्दीष्ट आहे, की प्रत्येक ग्रामीण घरात नियमितपणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा. जलशक्ती मंत्रालय, मिशनची उद्दीष्टे साध्य करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह एकत्र काम करत आहे.

शेखावत  यांचे दावे मंत्री दीपक पाऊसकर यांनी शुक्रवारी दिलेल्या विधानांच्या उलट आहेत. पाऊसकार यांच्या म्हणण्यानुसार “राज्यातील प्रत्येक घराला २०२४ च्या अखेरीस २४ तास पिण्याचे पाणी दिले जाईल.” 

२०२०-२१ मध्ये पंचायती राज संस्थांना १५ व्या वित्त आयोगाकडून अनुदान म्हणून ७५ कोटी रुपये मिळतील आणि त्यातील ५०% निधी पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी असेल.

शेखावत यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की  गोव्यातील २.6 लाख कुटुंबांपैकी २.२ लाख घरांमध्ये आधीच पाइपद्वारे पाणी जोडलेले आहे. 

 गोव्याने पुढील चार ते सहा महिने काम केले पाहिजे आणि गोरगरीब व अपंगांना टॅप कनेक्शन मिळवून देण्यासाठी सक्षम केले पाहिजे, असेही शेखावत यांनी म्हटले आहे.