राज्यात वाढत्या कोरोना बाधितांच्या पार्श्वभूमीवर गोवा विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तांत्रिक शिक्षण संचालनालयाकडून महाविद्यालयांमध्येच परीक्षा घेतल्या जात आहेत.
डिचोली येथील परीक्षा केंद्रात 15 जुलै रोजी झालेल्या परीक्षेला बसलेला एक विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याचे कळल्यानंतरही परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाहीत. तांत्रिक शिक्षण संचालनालयानेही परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घ्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
कोरोनाच्या वाढता संसर्गची भीती लक्षात घेऊन पालक आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्याआधीच मुख्यमंत्री, तांत्रिक शिक्षण संचालक यांच्याकडे परीक्षा रद्द करा म्हणून पत्राव्दारे मागणी केली होती. परंतु, तांत्रिक शिक्षण संचालकांवर याचा काही परिणाम झाला नाही.
डिचोली केंद्रात डिप्लोमाची परीक्षा देणार्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच विद्यार्थी तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पालक आणि विद्यार्थ्यांचा विरोध असतानाही तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे संचालक निर्णय बदलत नाहीत. विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबियांचा आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द कराव्या व ऑनलाईन पध्दतीचा वापर करावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
कोरोना बाधित आढळल्यानंतरही परीक्षा रद्द कऱण्यात आल्या नाहीत. डिप्लोमा विद्यार्थ्यांनी या आधीचे सर्व पेपर घाबरतच दिले आहेत. त्यामुळे जर परीक्षे दरम्यान आणखी विद्यार्थी कोरोना बाधित आढळले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, डिप्लोमा विद्यार्थ्यांचे आणखी चार विषयाचे पेपर शिल्लक आहेत. गोवा विद्यापीठ तसेच आयआयटी, महाविद्यालये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेत आहेत. असे असताना तांत्रिक शिक्षणाच्याच परीक्षा केंद्रामध्ये घेतल्या जात आहेत. सरकारने अशाच प्रकारे केंद्रांवर परीक्षा घेतल्या आणि परीक्षेवेळी कुणा विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास जबाबदारी कोण घेणार, अशा प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.