Home | विशेष | गोव्यातील जत्रेतल्या ‘ खाज्या’ ला भौगोलिक सूचकांक मानांकन जाहीर

गोव्यातील जत्रेतल्या ‘ खाज्या’ ला भौगोलिक सूचकांक मानांकन जाहीर

Goan Khaje

गोव्यातील खाजे या खाद्यपदार्थाला भौगोलिक सूचकांक मानांकन मिळाले आहे. खाजे हा प्रत्येक जत्रा, फेस्त आणि कव्वाली कार्यक्रमात विकला जाणारा खाद्यपदार्थ आहे. जत्रा म्हटल्यावर खाज्यांची खरेदी एक रिवाजच मानला जातो. जत्रेत गेला आणि खाजे सोबत आणले नाही म्हणजे जत्रा  पूर्णच होत नाही. खाज्याचा जत्रा ते भौगोलिक सूचकांकचा प्रवासही तितकाच रोचक आहे. 

पाहूया कसा. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना २०१६ मध्ये, खाज्याला भौगोलिक सूचकांक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी घेऊन डिचोलीचे प्रसिध्द खाजेकार राजाराम चणेकर गेले होते. त्यानंतर दीड वर्षापूर्वी  गोवा स्टेट काऊन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नोलॉजीचे संचालक लेविन्सन मार्टिन्स यांच्या मार्गदर्शनाखाली माधुरी शेटये आणि दीपक परब यांचा अभ्यास सुरू झाला. या सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. 

भौगोलिक सूचकांक मानांकन मिळवण्यासाठी खाजे गोव्यात मिळते, ही एकच बाब नव्हती. चेन्नईच्या ‘जिओग्राफीकल इंडिकेशन रजिस्ट्री’च्या अधिकाऱ्यांसमोर खाज्यांचे वैशिष्ट्य आणि इतिहास सादर करावा लागला. यासाठी डिचोली येथील ऑल गोवा खाजे प्रोड्युसर्स असोसिएशन आणि गोवा स्टेट काऊन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नोलॉजीचे दीपक परब आणि माधुरी शेटये यांना इतिहासतील दाखले दाखवावे लागले. 

‘चेंजिंग फेस ऑफ गोवन सोसायटी अंडर द रिपब्लिक’ या पुस्तकात खाजे चा उल्लेख असल्याची माहिती त्यांनी दिली.

 १९२२ मध्ये ‘गांधी’ या नावाने आणि त्यांच्या कामाने गोमंतकीयांना भुरळ घातली होती. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अंहिंसा मार्ग स्वीकारणाऱ्या गांधीजींचा गोमंतकीयांवर इतका प्रभाव पडला की, फातर्पेकरिणीच्या जत्रेत खाजे ‘गांधी खाजे’ या नावाने विकल्याची माहिती पुस्तकात असल्याचे त्यांनी सांगितले.  

खाजेचे वैशिष्ट्यही पटवून देणे तितकेच महत्त्वाचे होते. खाजे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बेसन, गूळ आणि तेल महाराष्ट्रातून आयात केले जात असले तरी खाजेला चव देणारे साहित्य गोव्यातील आहेत, असे असोसिएशन तसेच दीपक परब आणि माधुरी शेटये यांनी  पॅनलला सांगितले. येथील मीठ, आले आणि पाणी यांचा वेगळा गुणधर्म असल्यामुळे एक विशिष्ट प्रकारची चव खाज्याला येते. याशिवाय खाजे तयार करणारे कुशल कामगार देखील गोव्यातच आहेत, अशी माहिती दिल्यावर अधिकाऱ्यांनी ‘ खाजे’ ला भौगोलिक सूचकांक मानांकन देण्यास मंजुरी दिली आहे.

Scroll to Top