आज परिस्थितीजन्य कारणांमुळे प्रत्येक व्यक्ती ई-संसाधनांचा उपयोग करीत आहे परंतु आगामी काळात परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर देखील आपण या ई-संसाधनांचा अधिकाधिक उपयोग करणे चालूच ठेवले तरच त्याचे उद्दिष्ट साध्य होईल असे मत कला अकादमीच्या नाट्यकला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा गोवा विद्यापीठाच्या डिजिटल शिक्षण संचालनालयाचे माजी संचालक प्रा. रामराव वाघ यांनी व्यक्त केले.
गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागाने ‘मराठी भाषा व साहित्य : अध्ययन-अध्यापनात ई-तंत्रज्ञानाचे उपयोजन’ या विषयावर प्रथमच आयोजित केलेल्या राष्ट्रीय ई-परिसंवादाचे बीजभाषक या नात्याने ते बोलत होते. सद्यस्थितीत अध्ययन-अध्यापन क्षेत्रात ई-तंत्रज्ञानाचा वापर करणे नितांत आवश्यक बनले आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने या साधनांचा वापर करण्याचे कौशल्य विकसित केले पाहिजे असेही त्यांनी पुढे बोलताना म्हटले. दि. 18 जून रोजी या राष्ट्रीय ई-परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
गोवा क्रांतीदिन तसेच संत निवृत्तीनाथ समाधी दिनानिमित्त गोवा मुक्ती लढ्यातील सर्व हुतात्मा, स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देण्यात आली तसेच संत निवृत्तीनाथ यांचे पुण्यस्मरण करण्यात आले. मराठी विभागप्रमुख डॉ. सुनीता उम्रस्कर यांनी कार्यक्रमाचे औपचारिक स्वागत करताना विभागाच्या कार्याची माहिती दिली. या ई-परिसंवादाचे संयोजक प्रा. विनय मडगावकर यांनी प्रास्ताविकाच्या भाषणात ई-परिसंवादाच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. मराठी विभागाच्या अभ्यासक्रमात ई-संसाधनांच्या उपयोजनास मार्गदर्शक अशा विषयाचा समावेश असून त्यास अनुसरून मराठी विकिपिडीया कार्यशाळेचे आयोजन विभागाने या आधी केले होते तसेच संत सोहिरोबानाथ आंबिये अध्यासनाच्या सहकार्याने गोमन्तकीय मराठी २५ साहित्यिकांचे दृकश्राव्य ई-दस्तावेजीकरण मराठी विभागाने केले असल्याचे प्रा. मडगांवकर यांनी नमूद केले.
बडोदा-गुजरात येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. संजयकुमार करंदीकर यांनी ‘मराठी साहित्य – अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापनात ई-तंत्रज्ञानाचा वापर’ या विषयावर व्याख्यान दिले. कर्नाटक राज्य अक्कमहादेवी महिला विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातील सहायक प्राध्यापक अक्षय यार्दी यांनी ‘मराठी अध्ययनासाठी ई-संसाधनांचे उपयोजन’ या विषयानावर तर नामवंत वक्ते आणि मार्गदर्शक श्री. रवी बसवराज तुबाकी यांनी ‘मराठी अध्ययन-अध्यापनात उपयुक्त ठरणारी ई-तंत्रज्ञानाची साधने’ या विषयावर सादरीकरण केले.
ई-परिसंवादाच्या यशस्वी आयोजनासाठी कुलगुरू प्रोफेसर डॉ. वरूण साहनी, कुलसचिव प्रोफेसर डॉ. वाय. वी. रेड्डी यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. ई-परिसंवादात देशभरातील सुमारे 200 प्राध्यापक, व्याख्याते, संशोधक, शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रा. चिन्मय घैसास यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. पूर्वा वस्त आणि प्रा. राधिका नागवेकर यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. प्रा. विनायक बापट यांनी आभार व्यक्त केले. गोवा विद्यापीठाच्या डिजिटल शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. मलपती जनार्दनम, अभियंते सचिन संभाजी, सचिन पाटील, नितीन पाटील तसेच मराठी विभागातील कु. मर्लिन फर्नांडिस आणि चंद्रशेखर आमोणकर यांचेही सहकार्य लाभले.